• सर्व पोस्ट
  • वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र विभाग

विभागाचे शीर्षक

क्रीडा महोत्सव २०२५: बुध्दीबळ स्पर्धेची चुरस वाढली

क्रीडा महोत्सव २०२५: बुध्दीबळ स्पर्धेची चुरस वाढली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये बुद्धिबळ चौथ्या फेरीचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले. सरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, उच्च शिक्षण विभाग नांदेडचे सह-संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, नांदेडचे भूषण दिव्या बियाणी, ऍड.दीपा बियाणे, क्रीडा व शाररीक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, डॉ. प्रदीप देशमुख, सहा.कुलसचिव रवी मोहरीर, डॉ.शैलजा वाडीकर, प्रा. डॉ.लोणारकर, पंच प्रमूख प्रवीण ठाकरे ( जळगाव), डॉ. दिनकर हंबर्डे, डॉ. अरुण हंबर्डे, श्रीकांत मंत्री( लातूर), सुचिता हंबर्डे, गगनदीपसिंग रंधावा, सिद्धार्थ हटकर, प्रशांत सूर्यवंशी व सोपान कुटे यांच्या प्रमुख उपस्थीती संपन्न झाला. सदर स्पर्धेमध्ये २० मुलांचे संघ तर मुलींचे २० संघ सहभागी असून आंतरराष्ट्रीय गुणांक प्राप्त ६१ खेळाडू सहभागी झाले आहेत. पाचव्या फेरी अखेर मुलांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे प्रथम स्थानी असून द्वितीय स्थानी राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वितीय स्थानी आघाडीवर तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तृतीय स्थानी आघाडीवर आहेत. पाचव्या फेरी अखेर मुलींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रथम स्थानी तर शिवाजी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ द्वितीय स्थानी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तृतीय स्थानिक आघाडीवर आहेत.

क्रीडा महोत्सव २०२५: ॲथलेटिक्स स्पर्धेत राज्यभरातील विद्यापीठांचा उत्साह

क्रीडा महोत्सव २०२५: ॲथलेटिक्स स्पर्धेत राज्यभरातील विद्यापीठांचा उत्साह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये विविध विद्यापीठांच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. थाळीफेक (मुले) प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यश शेखरने ४५.५४ मीटर थाळी फेक करून प्रथम क्रमांक पटकावला. ४२.७३ मीटर थाळी फेकीसह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विश्व नलावडेला द्वितीय, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रेवण क्षीरसागरला ४०.८२ मीटरसह तृतीय क्रमांक मिळाला. उंच उडी (मुली) स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सुजाता बाबरने १.५१ मीटर उंच उडी मारत प्रथम क्रमांक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या साक्षी परिटने १.४८ मीटरसह द्वितीय, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या अपर्णा मोवचीने १.३५ मीटरसह तृतीय स्थान पटकावले. भालाफेक (मुली) प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सृष्टी सिंगने ३९.१४ मीटर अंतरासह प्रथम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुरेखा आडेने ३७.१९ मीटरसह द्वितीय, तर मुंबई विद्यापीठाच्या तनिष्ता दिनेशकुमारने ३१.५२ मीटरसह तृतीय क्रमांक पटकावला. लांब उडी (मुली) स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्वाती ऊकेने ५.१९ मीटर उडी मारत प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठाच्या शिप्रा निलने ५.१४ मीटर उडी मारत द्वितीय, तर त्याच विद्यापीठाच्या त्रिशा नायरने ५ मीटर उडीसह तृतीय क्रमांक मिळवला. रनिंग स्पर्धांनाही खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० मीटर धावणे (मुले) प्रकारात सोलापूर विद्यापीठाच्या विनित दिनकरने प्रथम, हर्ष राऊतने द्वितीय, तर नागपूर विद्यापीठाच्या अंकित नलावडेने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात पुणे विद्यापीठाच्या ऋतुजा भोसलेने प्रथम, मुंबई विद्यापीठाच्या त्रिशा नायरने द्वितीय, तर नागपूर विद्यापीठाच्या सानिया विनीतने तृतीय क्रमांक पटकावला. ४०० मीटर धावणे (मुले) स्पर्धेत मुंबई विद्यापीठच्या शैलेश मोकळने प्रथम, अली शेखने द्वितीय, तर यजमान विद्यापीठाच्या शंकर दरडने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींमध्ये मुंबई विद्यापीठाच्या फंजल देवीने प्रथम, सोलापूर विद्यापीठाच्या आकांक्षा गावडेने द्वितीय, तर नागपूर विद्यापीठाच्या पल्लवी डोंगरवारने तृतीय क्रमांक पटकावला. १५०० मीटर धावण्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रोशन माळीने प्रथम, नागपूर विद्यापीठाच्या भावेश खंदारेने द्वितीय, तर सोलापूर विद्यापीठाच्या दाजी हुबाळेने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात नागपूर विद्यापीठाच्या अंजली माडवीने प्रथम, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या अमृता गायकवाडने द्वितीय, तर नागपूर विद्यापीठाच्या भाग्यश्री महालेने तृतीय स्थान पटकावले. ५००० मीटर धावणे स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अभ सूर्यवंशीने प्रथम, सोलापूर विद्यापीठाच्या ईश्वर झीरवळने द्वितीय, तर अमरावती विद्यापीठाच्या नितीन हिवराळेने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आरती पावराने प्रथम, नागपूर विद्यापीठाच्या भाग्यश्री महालेने द्वितीय, तर पुणे विद्यापीठाच्या साक्षी बोराडेने तृतीय क्रमांक मिळवला. ४x१०० मीटर रिले मुलं आणि मुली या दोन्ही गटांमध्ये धावपटूंनी उत्कृष्ट वेग, अचूक बॅटन एक्सचेंज आणि संघभावनेच्या जोरावर शानदार कामगिरी केली. मुलांच्या गटात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरने अप्रतिम वेग दाखवत ४३.२४ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने ४३.७४ सेकंद वेळेसह द्वितीय, तर यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडने 44.02 सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या धावपटूंनी प्रभावी धाव सादर करत ५०.५९ सेकंद वेळेत विजेतेपद मिळवले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने ५१.८५ सेकंद वेळेसह द्वितीय, तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने ५२.२९ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला. ट्रिपल जंप (मुली) स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मधुरा खोबे यांनी अप्रतिम कामगिरी करत ११.०२ मीटर अंतराच्या उडीसह प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या प्रणिता जाधव यांनी १०.४६ मीटर उडी मारत द्वितीय क्रमांक मिळवला, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या हिमांशी तायवाडे यांनी १०.04 मीटर उडी नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला. संपूर्ण स्पर्धा दिवसभर उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. विविध विद्यापीठांच्या खेळाडूंनी क्रीडा कौशल्याची प्रभावी छाप उमटवत क्रीडा महोत्सव अधिक रंगतदार करून टाकला. पुढील दिवसांतही आणखी महत्त्वाच्या स्पर्धा रंगणार असून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामने; अनेक विद्यापीठांचा दणदणीत विजय

बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामने; अनेक विद्यापीठांचा दणदणीत विजय स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत मुले आणि मुलींच्या गटातील सामने उत्साहवर्धक वातावरणात पार पडले. मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संघाने उत्कृष्ट खेळाची छाप पाडत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संघावर ३–० असा सरळ विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर २–१ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी अचूक चालींवर स्वार होत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संघावर ३–० असा एकतर्फी विजय नोंदवला. बॅडमिंटन मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकवर ३–० असा निर्णायक विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. दुसऱ्या सामन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचा ३–० असा पराभव करून पुढील फेरीत मजल मारली. सकाळच्या सत्रात झालेल्या रोमांचक सामन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यावर २–१ असा थरारक विजय मिळवला. क्रीडा महोत्सवातील बॅडमिंटन सामने कौशल्य, चुरस आणि स्पर्धात्मकतेने परिपूर्ण ठरले असून पुढील सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

क्रीडा महोत्सव २०२५: सकाळच्या सत्रात व्हॉलीबॉल स्पर्धांचे रोमांचक सामने

क्रीडा महोत्सव २०२५: सकाळच्या सत्रात व्हॉलीबॉल स्पर्धांचे रोमांचक सामने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५च्या सकाळच्या सत्रात व्हॉलीबॉल मुली व मुले या क्रीडा प्रकारातील सामने उत्साह आणि चुरशीने पार पडले. व्हॉलीबॉल मुलींच्या गटातील सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर विरुद्ध महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक या संघांमध्ये सुरुवात झाली. नागपूर विद्यापीठाने प्रभावी खेळ करत विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आमनेसामने आले. छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाने सामना जिंकत पुढे मजल मारली. पुढील सामन्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विरुद्ध कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ, रामटेक असा मुकाबला झाला. गडचिरोली विद्यापीठाने उत्तम खेळ करत विजय निश्चित केला. यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्यात सामना झाला. डॉ. होमी भाभा मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी दाखवत विजय संपादन केला. सकाळच्या सत्रातील शेवटच्या सामन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विरुद्ध महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी असा सामना खेळला गेला. सोलापूर विद्यापीठाने दमदार प्रदर्शन करत सामना जिंकला. व्हॉलीबॉल मुलांच्या गटातील सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई विद्यापीठ, मुंबई विरुद्ध गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली असा सामना झाला. मुंबई विद्यापीठाने प्रभावी खेळ करत विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात खेळ झाला. सोलापूर विद्यापीठाने जोरदार खेळ करून सामना जिंकला. त्यानंतरच्या सामन्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी विरुद्ध यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक असा सामना रंगला. नाशिक विद्यापीठाने उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला. पुढील सामन्यात कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर आमनेसामने आले. नागपूर विद्यापीठाने सुरेख कामगिरी करत विजय निश्चित केला. सकाळच्या सत्रातील अखेरच्या सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे विरुद्ध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती असा सामना रंगला. अमरावती विद्यापीठाने हुशारीने खेळ करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. सकाळच्या सत्रातील सर्व व्हॉलीबॉल सामने खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळींमुळे आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उत्साहात पार पडले.

क्रीडा महोत्सव २०२५: टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य पूर्व फेरी

क्रीडा महोत्सव २०२५: टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य पूर्व फेरी यजमान नांदेड, मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठाचे मुलामुलींचे दोन्ही संघ उपांत्य पूर्व फेरीत दाखल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मधील टेबल टेनिस स्पर्धांना उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून मुलांच्या तसेच मुलींच्या गटातील प्रत्येकी आठ संघांनी उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मुलांच्या गटातील संघांनी दमदार प्रदर्शन करत पुढील फेरीत मार्गक्रमणा केली. यामध्ये यजमान स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मुंबई विद्यापीठ मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या संघांचा समावेश आहे. मुलींच्या गटातही स्पर्धा चुरशीची राहिली. यामध्ये मुंबई विद्यापीठ मुंबई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांनी शानदार खेळ करत उपांत्य पूर्व फेरीत स्थान पक्के केले. उपांत्य पूर्व फेरीत पोहोचलेल्या सर्व संघांचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने यांनी अभिनंदन करून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. पुढील फेऱ्यात अधिक रोमांचक सामने पाहायला मिळणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी विविध समित्यांमध्ये दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत.

क्रीडा महोत्सव: बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामने

क्रीडा महोत्सव: बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामने स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ च्या दुसऱ्या दिवशी बॅडमिंटन मुली व मुलांच्या गटात रोमांचक सामन्यांनी उत्साहाचे वातावरण रंगतदार झाले. मुलींच्या गटात झालेल्या सामन्यांमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिक यांच्यावर सरशी साधत दिवसाची विजयी सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी उत्कृष्ट कामगिरी करत होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई यांना पराभूत केले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी दमदार खेळ सादर करत कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांना मात दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांचा पराभव करत विजय नोंदवला. यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांना हरवत यश मिळविले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचा पराभव तर एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांनी छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ संघावर विजय मिळवला. मुलांच्या गटातही तितकेच चुरसपूर्ण सामने पार पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना पराभूत केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी संघर्षमय सामन्यात कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचा पराभव केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी अमरावती विद्यापीठ यांच्यावर उल्लेखनीय विजय मिळवला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यावर मात करून पुढे मजल मारली. मुंबईतील दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई विद्यापीठ यांचा डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ यांच्यावर विजय झाला. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना पराभूत करत सामन्याची सांगता विजयाने केली. क्रीडांगणात दिवसभर सर्व संघांनी शिस्तबद्ध खेळ, ऊर्जस्वल स्पर्धा आणि खेळाडूपणाचा उत्तम प्रत्यय देत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.