बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामने; अनेक विद्यापीठांचा दणदणीत विजय स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत मुले आणि मुलींच्या गटातील सामने उत्साहवर्धक वातावरणात पार पडले. मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संघाने उत्कृष्ट खेळाची छाप पाडत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संघावर ३–० असा सरळ विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर २–१ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी अचूक चालींवर स्वार होत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संघावर ३–० असा एकतर्फी विजय नोंदवला. बॅडमिंटन मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकवर ३–० असा निर्णायक विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. दुसऱ्या सामन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचा ३–० असा पराभव करून पुढील फेरीत मजल मारली. सकाळच्या सत्रात झालेल्या रोमांचक सामन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यावर २–१ असा थरारक विजय मिळवला. क्रीडा महोत्सवातील बॅडमिंटन सामने कौशल्य, चुरस आणि स्पर्धात्मकतेने परिपूर्ण ठरले असून पुढील सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.