क्रीडा महोत्सव २०२५: ॲथलेटिक्स स्पर्धेत राज्यभरातील विद्यापीठांचा उत्साह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये विविध विद्यापीठांच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. थाळीफेक (मुले) प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यश शेखरने ४५.५४ मीटर थाळी फेक करून प्रथम क्रमांक पटकावला. ४२.७३ मीटर थाळी फेकीसह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विश्व नलावडेला द्वितीय, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रेवण क्षीरसागरला ४०.८२ मीटरसह तृतीय क्रमांक मिळाला. उंच उडी (मुली) स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सुजाता बाबरने १.५१ मीटर उंच उडी मारत प्रथम क्रमांक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या साक्षी परिटने १.४८ मीटरसह द्वितीय, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या अपर्णा मोवचीने १.३५ मीटरसह तृतीय स्थान पटकावले. भालाफेक (मुली) प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सृष्टी सिंगने ३९.१४ मीटर अंतरासह प्रथम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुरेखा आडेने ३७.१९ मीटरसह द्वितीय, तर मुंबई विद्यापीठाच्या तनिष्ता दिनेशकुमारने ३१.५२ मीटरसह तृतीय क्रमांक पटकावला. लांब उडी (मुली) स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्वाती ऊकेने ५.१९ मीटर उडी मारत प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठाच्या शिप्रा निलने ५.१४ मीटर उडी मारत द्वितीय, तर त्याच विद्यापीठाच्या त्रिशा नायरने ५ मीटर उडीसह तृतीय क्रमांक मिळवला. रनिंग स्पर्धांनाही खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० मीटर धावणे (मुले) प्रकारात सोलापूर विद्यापीठाच्या विनित दिनकरने प्रथम, हर्ष राऊतने द्वितीय, तर नागपूर विद्यापीठाच्या अंकित नलावडेने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात पुणे विद्यापीठाच्या ऋतुजा भोसलेने प्रथम, मुंबई विद्यापीठाच्या त्रिशा नायरने द्वितीय, तर नागपूर विद्यापीठाच्या सानिया विनीतने तृतीय क्रमांक पटकावला. ४०० मीटर धावणे (मुले) स्पर्धेत मुंबई विद्यापीठच्या शैलेश मोकळने प्रथम, अली शेखने द्वितीय, तर यजमान विद्यापीठाच्या शंकर दरडने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींमध्ये मुंबई विद्यापीठाच्या फंजल देवीने प्रथम, सोलापूर विद्यापीठाच्या आकांक्षा गावडेने द्वितीय, तर नागपूर विद्यापीठाच्या पल्लवी डोंगरवारने तृतीय क्रमांक पटकावला. १५०० मीटर धावण्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रोशन माळीने प्रथम, नागपूर विद्यापीठाच्या भावेश खंदारेने द्वितीय, तर सोलापूर विद्यापीठाच्या दाजी हुबाळेने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात नागपूर विद्यापीठाच्या अंजली माडवीने प्रथम, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या अमृता गायकवाडने द्वितीय, तर नागपूर विद्यापीठाच्या भाग्यश्री महालेने तृतीय स्थान पटकावले. ५००० मीटर धावणे स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अभ सूर्यवंशीने प्रथम, सोलापूर विद्यापीठाच्या ईश्वर झीरवळने द्वितीय, तर अमरावती विद्यापीठाच्या नितीन हिवराळेने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आरती पावराने प्रथम, नागपूर विद्यापीठाच्या भाग्यश्री महालेने द्वितीय, तर पुणे विद्यापीठाच्या साक्षी बोराडेने तृतीय क्रमांक मिळवला. ४x१०० मीटर रिले मुलं आणि मुली या दोन्ही गटांमध्ये धावपटूंनी उत्कृष्ट वेग, अचूक बॅटन एक्सचेंज आणि संघभावनेच्या जोरावर शानदार कामगिरी केली. मुलांच्या गटात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरने अप्रतिम वेग दाखवत ४३.२४ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने ४३.७४ सेकंद वेळेसह द्वितीय, तर यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडने 44.02 सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या धावपटूंनी प्रभावी धाव सादर करत ५०.५९ सेकंद वेळेत विजेतेपद मिळवले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने ५१.८५ सेकंद वेळेसह द्वितीय, तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने ५२.२९ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला. ट्रिपल जंप (मुली) स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मधुरा खोबे यांनी अप्रतिम कामगिरी करत ११.०२ मीटर अंतराच्या उडीसह प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या प्रणिता जाधव यांनी १०.४६ मीटर उडी मारत द्वितीय क्रमांक मिळवला, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या हिमांशी तायवाडे यांनी १०.04 मीटर उडी नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला. संपूर्ण स्पर्धा दिवसभर उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. विविध विद्यापीठांच्या खेळाडूंनी क्रीडा कौशल्याची प्रभावी छाप उमटवत क्रीडा महोत्सव अधिक रंगतदार करून टाकला. पुढील दिवसांतही आणखी महत्त्वाच्या स्पर्धा रंगणार असून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.