क्रीडा महोत्सव २०२५: टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य पूर्व फेरी यजमान नांदेड, मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठाचे मुलामुलींचे दोन्ही संघ उपांत्य पूर्व फेरीत दाखल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मधील टेबल टेनिस स्पर्धांना उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून मुलांच्या तसेच मुलींच्या गटातील प्रत्येकी आठ संघांनी उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मुलांच्या गटातील संघांनी दमदार प्रदर्शन करत पुढील फेरीत मार्गक्रमणा केली. यामध्ये यजमान स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मुंबई विद्यापीठ मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या संघांचा समावेश आहे. मुलींच्या गटातही स्पर्धा चुरशीची राहिली. यामध्ये मुंबई विद्यापीठ मुंबई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांनी शानदार खेळ करत उपांत्य पूर्व फेरीत स्थान पक्के केले. उपांत्य पूर्व फेरीत पोहोचलेल्या सर्व संघांचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने यांनी अभिनंदन करून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. पुढील फेऱ्यात अधिक रोमांचक सामने पाहायला मिळणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी विविध समित्यांमध्ये दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत.